Thursday, 28 July 2016

उत्तम हा श्रावणमास

उत्तम हा श्रावणमास ...... !!!

           आपली भारतीय संस्कृती ही अत्यंत विशाल आणि परिपुर्ण संस्कृती आहे. भारतीय संस्कृती एवढी उदारमतवादी आणि "सर्वार्थाने " समृध्द संस्कृती कोणतीच नाही असे म्हणले तरी वावगे ठरणार नाही .प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा व जीवनातील प्रत्येक पैलूचा विकास साधणारी आपली भारतीय संस्कृती आहे. भारतीय संस्कृतीने केवळ भारतीयांनाच नव्हे तर जगातील सर्व व्यक्तींना त्यांच्या जीवनात परमोत्कर्ष साधण्याचा मार्ग (जो की अत्यंत सुलभ आहे) विशद केला .भारतीय संस्कृती ही नियमावली नसुन एक आदर्श ,समृध्द व कल्याणकारी जीवनप्रणाली आहे असे म्हणले तरीही अतिशयोक्ती होणार नाही .

         भारतीय संस्कृतीमधे उपासनेला अत्यंत महत्व आहे .ऐहिक जीवनाबरोबरच पारलौकिक जीवनाचा परमोत्कर्ष व्हावा याकरिता आपल्या परंपरेत पुर्वासुरानी उपासना महत्वाची सांगितली आहे .आपल्या उपास्य देवतेची अनन्यपणे उपासना करण्याचे अनेक मार्ग आपणांस उपलब्ध आहेत . उपासना ही अखंड व दृढतेने चालवावी असा आदेश आपणांस समर्थ रामदास स्वामींनीच दिलेला आहे तो असा ;
                                           "उपासकांसी सुचना ,उपासना उपासना" ..... !!!
         आपले उपास्य दैवत आणि उपासक यांच्यामध्ये अद्वैत साधण्यासाठी उपासनेचा मार्ग सांगितलेला आहे . ही उपासना कोणत्या दैवताची करावी हे उपासकावर अवलंबून आहे . मात्र ज्या देवतेची उपासना आरंभली आहे ती अन्यनतेने करावी . या उपासनेकरिता आपल्या संस्कृतीने काही कालमर्यादा घातल्या आहेत . मुळात उपासनेला काळाची मर्यादा नाही ;मात्र एखादया गोष्टीला काही मर्यादा घातल्या नाहीत तर त्याचे अवमूल्यन होण्याची शक्यता असते ,म्हणून आपणांस उपासनेकरिता काही कालमर्यादा सांगितल्या आहेत.
           भारतीय कालगणनेप्रमाणे  आता येऊ घातलेला "श्रावण " महिना हा उपासनेसाठी अत्यंत महत्वाचा सांगितलेला आहे . शिव ही श्रावण महिन्याची मुख्य आराध्य देवता आहे. उमामहेश्वराच्या पुजनाला या श्रावण महिन्यात अन्यनसाधारण महत्व आहे . या महिन्यात केलेली उपासना ही अधिक फलप्रद उपासना आहे .श्रावण शु. १(प्रतिपदा) ते श्रावण वद्य ३०(अमावास्या) ही उपासकांकरीता एक महापर्वणीचं जणू आहे. आपल्या परंपरेत श्रावण महिन्यात विविध दैवतांची उपासना सांगितली आहे .यात प्रामुख्याने उमामहेश्वराच्या पूजनाला महत्व आहे. या संपुर्ण महिन्यात विविध प्रकारच्या व्रतांचे परिपालन करावे . शक्य असल्यास महिनाभर उपवास करून केवळ फलाहार करून अखंड उपासना करावी मात्र व्यस्त जीवनात हे शक्य नसेल तर शक्य होईल तेवढी उपासना आवश्य करावी .
            श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी शिवउपासना करावी . भगवान शंकराच्या उपासनेने जीवनाचे अत्यंतिक कल्याण साधले जाते व अमंगलाचा नाश होतो. भगवान शंकर हे इतर देवतांच्या तुलनेत लवकर प्रसन्न होणारे आहेत म्हणुनच त्यांना "आशुतोष " असे म्हणतात .अशा भगवान शिवाची रुद्र ,महिन्म इत्यादी अनेकविध स्तोत्राद्वारे पूजा करून उपासना करावी.भगवान शंकराबरोबरच या महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी आपल्या अपत्याच्या
दीर्घयुष्याकरिता "जराजिवंतिकेचे "पुजन करतात तसेच प्रत्येक शनिवारी "अश्वत्थवृक्ष " व मारुतीरायांचे पुजन करावे ते कल्याणकारी ठरते . याबरोबरच या महिन्यात सण -उत्सवही आहेत .त्यांत नागपंचमी ,रक्षाबंधन ,श्रावणी ,जन्माष्टमी ,पिठोरी अमावस्या इत्यादी उत्सव आहेत . या सर्व उत्सवांच्या माध्यमातुन सर्व समाजाच्या राष्ट्राच्या आत्यंतिक हिताची प्रार्थना करूया ......!!!
                                         " श्रावणमासाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !! "
                                                               !!! धन्यवाद !!

No comments:

Post a Comment